हाणा रे!

एखाद्याने आपल्या तोंडात हाणावी (व्हर्चुअली, अक्षरशः नव्हे) अशी एखादी घटना तुमच्या बाबतीत घडली आहे का? घडली असेल, तर खाली कॉमेंट्समध्ये प्लीज लिहा. अताशा अशा घटनांची पुनरावृत्ती माझ्या बाबतीत बरीच व्हायला लागलेली आहे. दोन घटना खाली सांगतो, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होईल.

तर झाले काय, की माझ्याकडे काही पन्नास-साठ संस्कृत श्लोकांचा संग्रह आहे. मला मधून-मधून हुक्की येते की नवनवीन (माझ्यासाठी नवीन, तशी जुनीच) संस्कृत सुभाषिते पाहावी आणि त्याचे स्वतःसाठी भाषांतर करून त्यासारखे मराठी किंवा हिंदी काव्य किंवा गद्य साहित्यात काही आहे का याचा विचार करावा. त्या विचारांत असताना एकदा वाटले की कालिदासाच्या महाप्रसिद्ध "वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये" या श्लोकावर काही मटेरियल इंटरनेट वर मिळते का, ते पाहावे आणि मग जे मनात येईल ते लिहून काढावे.

मी शोधायला सुरूवात केली, काही लिंक्स फॉलो केल्या. काही-बाही वाचून झाले. एका कुठल्याशा ब्लॉग वर इंग्रजीमध्ये टीका होती. खरं तर इंग्रजी टीका वाचण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण तिथे गेलो. त्या अतिशय विद्वान माणसाने या श्लोकातील प्रत्येका शब्दाचाच नव्हे, तर प्रत्येका अक्षराचा कीस काढलेला होता, चांगल्या अर्थाने. त्या ब्लॉगवर त्याने या श्लोकाचा सखोल अर्थ आध्यात्माशी जोडून शेवटी खरे तर कालिदासाने शैव-वैष्णव मतांना एक करण्यासाठी या श्लोकात काय जादू करून ठेवली आहे हे सुद्धा सांगितले. त्यांनी ज्या पद्धतीने आपले म्हणणे मांडले होते, त्याला मी मनोमन साष्टांग नमस्कार केला आणि या श्लोकावर काही लिहीण्याच्या विचारावर तुळशीपत्र ठेवले.

ती चपराक चांगलीच लक्षात राहील. काही वेळ मी नुसता बसून होतो. सारख्या पुलंच्या ओळी आठवत होत्या, "आपण कोण, आपला शैक्षणिक दर्जा काय, आपले एकंदर कर्तृत्व काय." तोंडातून वाचा फुटेना. त्या अवस्थेत तो ब्लॉग मिटून कॉम्प्युटर केव्हा बंद केला कळलेसुद्धा नाही. साधारण आठ ते दहा मिनिटांनंतर जेव्हा सावरलो, तेव्हा वाटले होते की आपण साधे आपल्या गल्लीतले गावस्करसुद्धा नाही. (पुन्हा पु.ल.! कसे होणार माझे.) या गोंधळात आता तो लेख काही केल्या सापडत नाही. अनेक प्रकारे पुन्हा-पुन्हा शोध करून पाहिला, पण हाती भोपळाच लागला. तर ही खरी शोकांतिका.

त्यानंतर या ब्लॉगचा प्रपंच सुरू झाला. यावरील एक पोस्ट वाचून माझा एक मित्र(!) मला "दुसरा शिरीष कणेकर" म्हणून मोकळा झाला. खरी गंमत त्यानंतर झाली. व्हॉट्सअॅप वर माझ्या भावाने मला शिरीष कणेकरांचा लता मंगेशकर कशी त्यांच्या घरी जेवायला आली त्या प्रसंगावरील एक लेख फॉरवर्ड केला. तो लेख वाचल्यावर मी आधी त्या मित्राला तो लेख पाठवला आणि मग आपण साधे आपल्या गल्लीतले अतुल बेदाडे सुद्धा नाही हे मनाशी पक्के ठरवून टाकले. अनेकांना अतुल बेदाडे कोण होता हा प्रश्न पडेल, पण माझा हेतू तोच आहे. जे नाव कोणाला आठवत नाही ते नाव सुद्धा मी माझ्या गल्लीत स्वतःसाठी वापरू शकत नाही.

तर अशा प्रकारे डोळे उघडणारे प्रकार अनेक घडलेले आहेत. या जाणिवांमधून वाट काढीत माझी आपली कुत्र्याच्या सरळ न होणाऱ्या शेपटा प्रमाणे लेखनाची धडपड सुरू आहेच. त्यात नुकताच कालिदासाचा रघुवंशातील एक आणखी श्लोक वाचण्यात आला. तो जसाचा तसा खाली देत आहे. या वेळेला शब्दांचा साधा अर्थ सांगण्याचीसुद्धा हिंमत राहिलेली नाही. अवाक् होणे हा तर आमचा स्थायी भावच.


सञ्चारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीताय पतिंवरा सा।
नरेन्द्रमार्गाट्ठ इव प्रपेदे, विवर्णभावं स स भूमिपाल:॥

Comments