मी - एक लोभी माणूस!
संगीत विषयक बोलायचे झाले, तर गेले वर्ष माझ्यासाठी आत्तापर्यंतचे सर्वात
सुश्राव्य होते असे म्हणावे लागेल. वर्षाच्या सुरूवातीलाच, म्हणजे 15 जानेवारी
रोजी देवासला भानुकुलमध्ये कलापिनीताईंना ऐकायचा योग आला. त्यांच्या गाण्याआधी पं.
सत्यशील देशपांडे, रवी दाते आणि अशोक वाजपेयी यांच्या सारख्या वक्त्यांनी
सांगितलेल्या कुमारजींच्या आणि त्यांच्या संगीताच्या आठवणी ऐकायला मिळाल्या.
कलापिनीताईंच्या अप्रतिम गाण्यानंतर माझे वडील रवी दाते यांच्याशी बोलले – ते दोघे
शाळूसोबती आहेत. मलासुद्धा भुवनेशजींशी दोन वाक्ये बोलायची संधी मिळाली, पण तो माझा स्वार्थ होता. मज पामरासी काय थोर पण! यादिवशी तबल्यावर मयंक बेडेकर आणि संवादिनीवर मला वाटते उपकार
गोडबोले यांनी साथ केली होती.
मार्च महिन्याच्या शेवटी गुढी पाडव्याच्या दोन किंवा तीन दिवसांनंतर इंदोरला
झालेल्या सांघी स्मृती समारंभात पुन्हा एकदा कलापिनीताईंचे गाणे ऐकले. तेव्हा त्या
नंद (आनंदी कल्याण) गायल्या होत्या. द्रुत मध्ये कुमारजींनी रचलेली चीज "आ जा
रे राजन अब तो आ" होती. मी आणि माझा मोठा भाऊ उल्हास – आम्हां दोघांना हा राग
अतिशय आवडतो. आम्ही ऐकलेल्या विविध कलाकारांच्या नंद रागाबद्दल उल्हासचे एक
विशिष्ट मत आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वसुंधराबाईंचा नंद हा एखाद्या सोज्वळ,
घरगुती आईप्रमाणे भासतो, तर वसंतरावांचा नंद आळीतल्या दादा सारखा ऐटीत वावरत असतो.
किशोरी अमोणकरांचा नंद एखाद्या प्रजावत्सल, पण वरकरणी कडक साम्राज्ञीच्या रूपात
येतो, तर अमीर खां साहेबांचा नंद त्याच देशाच्या सम्राटाच्या रूपात. पंडितद्वय
राजन आणि साजन मिश्र यांचा नंद थोड्या वेगळ्या स्वरूपाचा, म्हणजे एखाद्या परदेशात
राहाणाऱ्या दूरच्या नातलगाप्रमाणे भासतो, ज्याने गेली अनेक वर्षे आपल्याशी संबंध जोपासले
आहेत. कलापिनी ताईंचा नंद अशाप्रकारे परिभाषित करणे मलातरी जड जाते आहे. मला वाटते
अजून मला तालमीची गरज आहे.
त्यानंतर इंदौरलाच धनंजय जोशी यांची सकाळची मैफल झाली होती. या वेळी सुद्धा
मयंक बेडेकर त्यांच्या साथीला तबल्यावर होते. जोशींच्या "रतिहून सुंदर मदन
मंजिरी"ने मला अक्षरशः वेड लावले होते. हे वेड पुढचे काही आठवडे टिकले. त्यानंतर
माझे व्हॉट्सअॅपवरील मित्र आणि मयंकचे वडील श्री. मिलिंद बेडेकर यांनी मला त्या
दिवशीच्या मैफिलीचे एक लहानसे रेकॉर्डिंग पाठवले. त्याचे श्रव्य-पारायण आजही मी
करतो.
ऑगस्टमध्ये उज्जैनला महाकाळ मंदिराच्या आवारात झालेला कार्यक्रम अशीच एक अफलातून
घटना होती. मी याच ब्लॉगवर इतर पोस्टमध्ये त्याचे वर्णन केलेले आहे. याच ब्लॉगवरील
हिंदीमध्ये लिहीलेली पोस्ट "उज्जैन में एक और संगीत-भरी शाम" पाहाणे.
सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा उज्जैनला राजन आणि साजन मिश्र यांच्या
कार्यक्रमात हजेरी लावता आली. त्या संध्याकाळी त्यांनी श्याम कल्याण राग घेतला
होता. अतिशय सुंदर मैफल झाली. कान तृप्त झाले.
या वर्षी राहुल देशपांडे यांचा ऑडियो ब्लॉगसुद्धा ऐकला. या ब्लॉगमध्ये एकूण
साधारण 10 (अधिक ही असू शकतात) भाग आहेत. अॅपल आयफोन किंवा आयपॅड असल्यास
पॉडकास्टमधून (आयट्यून्स) हा ब्लॉग विनामूल्य स्ट्रीम करता येतो. ऑडियो क्वालिटी
फार छान आहे आणि राहुलजींनी प्रत्येका ब्लॉगसाठी साधारण 55 मिनिटे ते एक तास एवढा
वेळ दिलेला आहे. प्रत्येक वेळा ऑडियो ब्लॉग ऐकल्यानंतर मी ट्विटरवर त्यांना
वैयक्तिक संदेश पाठवून फीडबॅकसुद्धा दिला. आमचा उद्धटपणा काय वर्णावा!
तर
एकूण अशा प्रकारे हे वर्ष माझ्या कानांना बरेच काही देऊन गेले. मला संपूर्णपणे
जाणीव आहे की ऐकण्याच्या बाबतीत माझी पावले अजून लटपटतात. त्यावर एकमेव उपाय म्हणजे
"अधिक ऐकणे तरी निरंतर ऐकणे" हाच आहे. मला आशा वाटते की कधी तरी मला
झाकिर हुसैन यांच्या वाक्यातील मर्म कळेल – "सुनना ही आधा सीखना होता
है." तसेच या ब्लॉगची सर्वात पहिली ओळ मला दरवर्षी लिहीता यावी अशीही मी
कामना करतो. यालाच शास्त्रांमध्ये "लोभ" म्हटले आहे. मी लोभी आहे.
Kammu, apraateem lihile ahes. Tula miLalela audio (ratihuni sunder) jamlyas mala paN forward kar.
ReplyDeleteKammu, apraateem lihile ahes. Tula miLalela audio (ratihuni sunder) jamlyas mala paN forward kar.
ReplyDeleteवाचून सुद्धा आइकल्या सारखी जाणीव झाली,खरोखर सूंदर लिहिला आहेस,,जिंकल रे
ReplyDelete