कोणा कशी कळावी
"मी... पुढचा शुक्रवार माझा
लास्ट वर्किंग डे असणार आहे कंपनीमध्ये," आनंदी
नचिकेतकडे रोखून पाहात म्हणाली. नचिकेत बराच वेळ काही बोलला
नाही. तिच्याकडे बघत, स्वतःचा खालचा ओठ
चावत बसून होता. नाही म्हणायला मधूनच आपल्या कोरड्या पडत
असलेल्या ओठांवर जीभ फिरवीत होता, पण एकूण स्तब्धच.
"तू ठरवलंस तर, शेवटी,"
नचिकेत उसासा टाकत एकदाचा बोलता झाला.
"ठरवलेलं तर आधीच होतं रे, I am only acting
it out now. तुला ते रियलाइझ झालेलं नव्हतं." आनंदी स्पेशल पॉझ. "अजून झालेलं दिसत नाहीये."
तिने स्वतःची कोल्ड कॉफी संपवली. "तू हे
खाणार आहेस का?" त्याच्या बशीतली इडली तशीच चटणी-सांबारात भिजून होती.
"तुला इडली... असू देत. हो, मी खाणार आहे." त्याला
आता तिच्याकडे पाहावेनासे होत होते. ही मुलगी एवढी अलिप्त
कशी राहू शकते? पण हा प्रश्न आजचा नव्हता. गेले चार महिने परोपरीन प्रयत्न करूनही त्याला या प्रश्नाचे उत्तर
सापडलेले नव्हते. घशातून घास खाली ढकलायला त्याला बराच त्रास
होत होता. त्याने पाण्यासोबत घास गिळला.
चार महिने. साधारण सहा महिने पूर्वी
त्याने फ्रीलांस कॉपी राइटिंग करतानाच नोकरीचा अनुभव घेण्याचे ठरवले होते. त्यासाठी मनीष आणि सुरभि गोडबोले यांच्या जाहिरात आणि मार्केटिंग
एजेंसीमध्ये त्याने नोकरी धरली होती.
तिथे अकाउंट्समध्ये अनेक वर्षे कामाला असलेले आत्माराम
मोहपात्रा त्याच्या शेजारीच राहात असत. तसा एजेंसीचा व्याप
फार मोठा नव्हता. त्याला मोजून तिघे कॉपीराइटर्स, दोघे मालक मगो सर - सुगो मॅडम आणि आनंदी नवे
गिऱ्हाइक शोधणार, डीटीपी आणि इतर कामांसाठी दोघी पोरी अमृता
आणि गीतिका, अकाउंट्समध्ये एटीएम म्हणजेच आत्माराम मोहपात्रा
आणि त्यांच्या मदतीला असलेला प्रसेनजित. अॅनिमेशन आणि
ड्रॉइंगचे काम सुगो तिच्या मैत्रिणीच्या फर्मला देत असे. एजेंसी
लहान असूनही टर्नओव्हर बऱ्यापैकी होता. नचिकेतसोबतचे दोघे
कॉपीराइटर्स – अभय आणि केदार – अनुभवी होते.
जॉइन केल्यावर त्याची पहिली मैत्री झाली होती ती आनंदीसोबत.
साधारण पहिल्या आठवड्यातच एकतर्फी प्रेमात पडल्यावर आणि पुढचे दोन
महिने तिच्यासोबत भटकंती, शॉपिंग, अनेक
लंच आणि डिनर्स झाल्यानंतर त्याला वाटले की आपले मनोगत व्यक्त करावे. अशाच एका लंचच्या प्रसंगी त्याने धैर्य एकवटून प्रयत्न केलाच.
"येडा का खुळा रे तू?" तिने
आपल्या आजोबांना स्मरून सरबत्ती सुरू केली. बराच वेळ हळू
आवाजात पण कठोरपणे तिने त्याला गुंडाळणे चालू ठेवले. पहिला
वागौघ संपल्यावर ती जरा शांत झाली.
"पण का?" त्याने
अर्धमेल्या आवाजात विचारले.
"तुला खरं कारण जाणून घ्यायचंय? दीर्घकथा आहे, पण थोडक्यात सांगते. माझ्या आधीच्या कंपनीत माझा एक कलीग होता. कॉम्प्यूटर
इंजिनियर होता गाढव, पण अॅडव्हर्टाइझिंग आवडते म्हणून त्या
कंपनीत नोकरीला आला. एक छंद म्हणून. सौरभ
नाव होते त्याचे. त्यालाही माहीत होते की आपण एक वर्षापेक्षा
जास्त इथे टिकणार नाही आहोत.
"पण काही दिवसातच मी त्याच्या प्रेमात पडले. तोही सेल्समध्येच होता, त्यामुळे एकत्र काम करण्याचे
खूप प्रसंग येत. घसट वाढत गेली, मैत्री
जमली, प्रेम झालं, ते एकमेकांना व्यक्त
करूनही झालं. मज्जानी लाईफ. मी तर
वाऱ्यावर तरंगत असे त्या दिवसांत. खरंच, जग एवढं सुंदर दिसतं
त्या परिस्थितीत. तो गोडवा, ते सौंदर्य
कधी दिसेनासे होईल हा विचारसुद्धा मनात येत नाही तेव्हा. आठ-नऊ महिने कसे निघून गेले कळलेसुद्धा नाही.
"एके दिवशी सौरभ मला म्हणाला, 'नंदे,
परवा माझा शेवटला दिवस. मी नोकरी सोडली.'
दोनच वाक्ये. धाडकन जमिनीवर आपटल्यासारखं
वाटलं मला.
"साहजिकच मी म्हटले, 'तू कधी
ठरवलेस? राजिनामा देऊन मोकळासुद्धा झालास? मला आधी सांगितले नाहीस?' रडकुंडीला आले होते मी.
आम्ही ऑफिसमधल्या एका केबिनमध्ये होतो म्हणून बरं. डोकं धरून बसून होते मी बराच वेळ.
"त्याला आयटी कंपनीतून ऑफर आली होती. पगाराचा आकडा अर्थातच अफाट होता. त्याने काहीबाही
सांगून माझी समजूत घातली. मला त्यावेळीच कळायला हवे होते
पुढे काय वाढून ठेवले आहे ते. पण I was the romantic
fool in that relationship. कळले, पण वळले
नाही असे म्हण हवं तर. त्याने नोकरी सोडली तरी आपले प्रेम
टिकून राहाणारच या विश्वासावर होते मी. काही दिवस तसे चालले
सुद्धा.
"साधारण वर्षभरानंतर तो अमेरिकेला गेला. 'दोनच वर्षांसाठी, नंदे. परत
आल्यावर लग्न करूया.' हा त्याचा एयरपोर्टवरील शेवटचा निरोप. तिथे गेल्यावर
एक-दोन महिने आमचे रोज बोलणे होई. फोन,
स्काइप, फेसबुक, व्हॉट्सएप.
हळू-हळू फ्रीक्वंसी कमी होत गेली. एके दिवशी फेसबुक वर त्याचा स्टॅटस "In a
relationship” दिसला. आपणच असणार या खुषीत प्रोफाइलवर गेले. कव्हर फोटोत इतर कोणी मुलगी होती. माझ्या प्रश्नाला I have found somebody more wonderful, so I'm
breaking up with you. असे
उत्तर मिळाले. त्या दिवशी हवे तेवढे रडून घेतले. नको तेवढे रडले, असं म्हण हवं तर.
मग ठरवले, आता टिपे गाळण्यात अर्थ नाही. I needed to move on. पण पुन्हा या फंदात शक्यतो पडणे नाही.”
त्याने आश्चर्याने
विचारले, “म्हणजे आयुष्यभर एकटी राहाणार तू?”
“राहू शकते. किंवा निर्णय बदलू ही शकते. मला माहीत नाही. कदाचित अॅरेंज मॅरिजला सुद्धा तयार होईन. As of today, I just don't care.”
जेवण झाल्यावर दोघे बाहेर
आले. Do we remain
friends, असा त्याला पडलेला
प्रश्न त्याने दोन-तीनदा तोंड उघडूनही विचारला नव्हता. रिजेक्शन कसे घ्यावे याचाच त्याला प्रश्न पडलेला
होता. चौथ्यांदा हाच प्रश्न विचारण्यासाठी
त्याने तोंड उघडून पुन्हा मिटले तेव्हा तीच म्हणाली होती, “हो, मला आपले भेटणे, एकत्र वेळ घालवणे आवडते. I don't see why we can't continue.”
आणि आज तिने हा बाँब
टाकला होता. आनंदी तिच्यासोबत झालेल्या अन्यायाची
परतफेड आपल्यावर अन्याय करून करते आहे का, असेही त्याच्या मनात आले. पण त्याच्या हाती
काहीच नव्हते. एका शेवटच्या प्रयत्नाशिवाय.
"तुझ्या मनात काहीही नसू देत, पण माझ्या मनात तुझ्यासाठी बरेच काही आहे. चांगलाच मोठा सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यामुळे
माझ्यासाठी हे फार कठीण आहे. लक्षात ठेव, आज नाही, पण वर्ष-दोन वर्षांनी, पाच वर्षांनी, दहा, वीस, पंचवीस, पन्नास वर्षांनतरसुद्धा
जर तुला माझ्या प्रेमाचा स्वीकार करावासा वाटला, तर I will be
there for you. Forever.”
ती मस्त हसली. त्याचा हात हातात घेत म्हणाली, “I know. I know how you feel,
because I've been there. In that exact spot. मला खात्री आहे की खरोखरच पन्नास वर्षांनीसुद्धा I can find support in you. पण मला ते सगळं नाही वाटत जे तुला
माझ्याबद्दल वाटतं. And
I'm NOT sorry about that.”
“Still, always keep
that in mind. I'll be there for you. No matter what happens in our lives, I
WILL be there for you. Trust me on that.” त्याने हात सोडवून घेतला.
पुढच्या शुक्रवारी आनंदी
त्याला शेवटची भेटली. शेकहँड करताना तो म्हणाला, “तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है
तुमको, मेरी बात और है – मैंने तो मुहब्बत की है.”
“मला वाटतच होते की तू
असा काहीतरी पांचटपणा करणार. Take care. जगात असं
बरंच काही आहे जे तू अनुभवलेलं नाहीस. त्यातलाच हा एक धडा समज. And thank you for your feelings
towards me. I can’t reciprocate, but your friendship is valuable for me. Thank
you for that friendship.”
आनंदी स्मित करीत म्हणाली.
पण त्यानंतर तिच्याकडून
स्वतःहून संपर्क घडला नाही. नचिकेतच्या व्हॉट्सएप मेसेजेसना ती उत्तर देत असे.
काही दिवसांनी ते ही कमी झाले. नंतर तिने त्याला लिहीले, ‘Going to Australia next week. This
is my email address. Be in touch.’ त्याने फोन केला, तो तिने घेतला नाही. त्याने दुसऱ्यांदा प्रयत्न नाही
केला.
त्याचे पुढचे काही आठवडे
भयाण शांततेत गेले. त्याचे डोके चालेच ना. मेंदू सुन्न झालेला वाटत होता. नवीन
विचार, क्रियेटिव्हिटी पार तळाला गेल्यासारखे झाले होते. काहीच सुचेनासे झाले.
कामावर त्याचा प्रभाव दिसू लागला. मग मात्र त्याने मगो सरांना सांगून एक आठवडा रजा
घेतली. स्वतःच्या भावना डायरीत लिहून काढण्यात त्याचे दोन दिवस गेले. शाळूसोबती
प्रतीक उर्फ पक्यासोबत मोटरसायकलवर दिवसभर भटकून झाले. व्हिस्की पिऊन भडाभडा ओकून
झाले. पक्याला दिलाची कहाणी सांगून एकाच वेळी हसून आणि रडून झाले. आठवडा संपला. या
कॅथार्सिसमुळे ठिकाणावर आलेले डोके घेऊन तो पुन्हा ऑफिसात रुजू झाला. तरीही नचिकेतला सारखी आनंदीची आठवण येतच होती. सकाळी उठल्यावर डोक्यात पहिला
विचार तिचाच. उघड्या डोळ्यांपुढे आनंदीचा चेहरा असे. रात्री झोपताना शेवटला विचार
तिचाच. तशी बिछान्यावर पडल्यावर त्याला झोप लगेच लागे आणि झोपही गाढ होती म्हणून
तिच्या विचारांमुळे त्याची झोप उडाली असे झाले नाही. पण दिवसभरात कधीही एकदम आठवण
येई. त्यावर तोडगा म्हणून नचिकेत "कोणा कशी कळावी" हे कुमारजींचे गाणे
गुणगुणत असे. एकूणच या काळात संगीताचा त्याला फार आधार वाटत असे. दिवसभर कामात
असताना ईयरफोन्सद्वारे त्याच्या मोबाइलमधील किंवा वेब वरील गाणी ऐकत असायचा.
दुसऱ्याच दिवशी मगो
सरांनी त्याला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. सुगो मॅडम होत्याच.
तो रजेवर असताना सेल्ससाठी
जॉइन झालेली तेजस्विनी बसली होती. “निक, एक क्लायंट साइटवर जाऊन काम करण्याची संधी आहे. एक आठवडा अमूक तमूक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या
ऑफिसमध्ये रोज जायचे, तेथील वातावरण, कामाची पद्धत, लोक हे सर्व ऑब्झर्व करायचे आणि मग
प्रिंट आणि व्हिडियो कॉपी तयार करायची. तुला आवडेल?”
नचिकेत मनोमन सुखावला. असा एखादा क्लायंट मिळावा हे तर त्याचे स्वप्नच
होते. “होय, सर. असे एखादे काम मिळायला हवे हे तर मला फार
आधीपासून वाटत होते. मला नक्कीच हे करायला आवडेल.” पुढे काहीच न विचारता तो म्हणाला.
“गुड. तर उद्यापासून तू आणि तेजस्विनी डायरेक्ट तिथे जा. उद्या गुरुवार, म्हणजे 12 तारीख. जमेल ना?” ही बया कशासाठी? असा विचार त्याच्या मनात डोकावला. मगो पुढे म्हणाले, “तू दिवस भर क्रियेटिव्ह आयडियाजच्या मागे असणार. She will try to sell some other ideas to the
client and she'll be finalizing the details of this deal with their top brass.
And she's there to support you administratively. You'll be sharing a cabin
there.”
त्याने घरी आल्यावर आनंदीला मोट्ठा ईमेल केला. त्यात
त्याला नवीन प्रोजेक्टमुळे झालेला आनंद, एक्साइटमेंट सर्व उघड केले. अजूनही त्याच्या
मनात कुठेतरी एक भाबडी आशा होतीच, की आनंदी त्याला प्रतिसाद देईल. तिचे उत्तर
त्याला दोन दिवसांनंतर आले. एकच ओळ, “Good for you.” नशीब
त्याने तो मेल शनिवारी संध्याकाळी पाहिला. रविवार भर पुन्हा त्याचा देवदास झालाच,
पण सोमवारी क्लायंटकडे जाताना सावरला होता.
गुरुवार 12 तारखेला तो
आणि तेजस्विनी क्लायंटच्या ऑफिसात एकत्र पोचले. क्लायंटच्या मॅनेजिंग डायरेक्टर
आणि इतर तिघांसोबत त्यांची मीटिंग सकाळीच शेड्यूल केलेली होती. कॉफीचा घोट घेत
एमडी म्हणाल्या, “निक, तुझ्या साहेबांनी तुझी फार तारीफ केलेली आहे. मला सांग, या
आधी तू अशा प्रोजेक्टवर काम केले आहेस का? आणि केले असलेस, तर कुठे?”
“नाही मॅडम. असा
प्रोजेक्ट करावा हे माझ्या डोक्यात फार आधीपासून होते. पण संधी आजवर मिळालेली
नव्हती. साधारणपणे क्लायंट यासाठी तयार होत नाहीत. त्यांना हे सर्व अनावश्यक
वाटते. खर्चही जास्त पडतो. त्यामुळे जेनेरिक कॉपीवरच ते समाधान मानतात. हा तसाही
नवीन कॉन्संप्ट असल्यामुळे सर्वांनाच तो पटेल असे नाही.” नचिकेतने उत्तर दिले.
“Call me Radhika. तर तू या प्रोजेक्टबद्दल काय विचार केला
आहेस? Show me your
homework. तेजस्विनी, जरा
थांब. आपण आज दुपारी 3 वाजता बोलणार आहोतच. मला जरा क्रियेटिव्ह साइड पाहून घेऊ
दे.” चुळबूळ करणाऱ्या तेजस्विनीला थोपवत राधिका म्हणाली. तेजस्विनीला आपली तयारी
पुश करायची होती, पण तिला स्वस्थ बसावे लागले.
“या कॅम्पेनपासून
तुम्हाला अभिप्रेत आहे अवेयरनेस. तुम्हांला सर्वसामान्यांना सांगायचे आहे तुम्ही
कोण आहात, काय करता, तुमचा कस्टमर बेस काय, तुमची शक्तीस्थळे कोणती आणि तुमचा
व्हिजन काय आहे. तुम्ही सध्या प्रायव्हेट लिमिटेड आहात, पण साधारण सहा ते आठ
महिन्यांनंतर तुम्ही आयपीओ काढणार आहात. त्यासाठी हा खटाटोप. आयपीओ येण्याच्या
साधारण दोन महिने आधीपासून तुम्हाला प्रिंट आणि टीव्ही या दोन्ही मीडियावर झळकायचे
आहे...”
साधारण पाऊण तास नचिकेतने
आपले विचार मांडले. इतर तिघांपैकी एक पाच मिनिटांनंतर निघून गेले, पण दोघेजण आणि
एमडी राधिका यांच्या प्रश्नांची उत्तरे देत, आपले म्हणणे पटवून देत, त्यांनी सुचवलेल्या
बदलांपैकी काही स्वीकार करीत, काही सकारण नाकारीत त्याने मीटिंग गाजवली.
“ग्रेट. तेजस्विनी, आपण
तीन ऐवजी चार वाजता भेटू या. ही मीटिंग फार लांबली. But it was interesting. I am good with your
approach.” शेवटली दोन
वाक्ये नचिकेतला उद्देशून बोलत राधिका तिच्या सहकाऱ्यांसोबत निघून गेली. मोठ्ठा
निश्वास टाकत नचिकेत खुर्चीत बसला. समोरचा पाण्याचा ग्लास त्याने एका दमात रिकामा
केला आणि पाण्याच्या बाटलीकडे हात नेला.
“आपली बसायची जागा कुठे
आहे, तेजस्विनी?” त्याने विचारले.
“याच कॉन्फरन्स रूममध्ये
बसायचे आहे आपल्याला.” तिने तुटकपणे उत्तर दिले. तिच्या मते सकाळ वायाच गेली होती.
तिला वाटले होते की राधिकाला नचिकेतच्या कामात फारसा इंटरेस्ट नसणार. त्यामुळे
लंचच्या आधी एक अनशेड्यूल्ड मीटिंग करून घ्यायचे तिच्या मनात होते. तो बेत
नचिकेतमुळे फसला होता.
“काय? इथे बसायचे आपण?
नो, नो, नो. ही जागा ऑफिसमध्ये पार एकीकडे आहे. मुख्य हॉल दिसत नाही. इथून कसले
ऑब्झर्वेशन होणार? It is
like solitary confinement. तू
राधिकाशी किंवा इतर कोणाशी बोलून दुसरी एखादी जागा मिळवू शकतेस का?”
तेजस्विनी उत्तरली, “बघते
मी. आज तरी हे होईल असे वाटत नाही. तू ऐकलेच आहेस, राधिका मला चार वाजता भेटणार
आहे. त्या आधी काही होईल असं वाटत नाही.”
“अगं, आजचा दिवस वाया
जाईल माझा. असं काय करतेस. राधिका नाही तर इतर कोणाशी तरी बोल ना. अॅडमिनमध्ये कोण आहे त्यांना तू ओळखतेस का?”
“अॅडमिनमध्ये जगदाळे सर आहेत. तेच, जे तुझ्या मीटिंगला
थांबले नाहीत. मी जरा ही स्प्रेडशीट अपडेट करते, तूच का नाही बोलत त्यांच्याशी?”
तेजस्विनी लॅपटॉपकडे पाहात म्हणाली.
नचिकेत खोली बाहेर आला. काही पावले चालत गेल्यावर हॉलमध्ये
येऊन त्याने चारीकडे पाहिले. साधारण 30 लोकांचा स्टाफ बसेल एवढा हॉल होता. जवळ-जवळ
सगळे आलेले होते. उजव्या बाजूला एमडीचे केबिन होते. नचिकेतच्या समोर पलिकडे चार
लहान केबिन्स होत्या. त्यातील एकाच्या काचेवर पडदे ओढलेले होते. इतर तीन रिकाम्या
दिसत होत्या.
“एक्सक्यूज मी. जगदाळे सर कुठे बसतात सांगाल का?” त्याने
सर्वात जवळच्या सीटवर बसलेल्या मुलीला विचारले. तिने त्या पडदे ओढलेल्या केबिनकडे
बोट दाखवले. “हम आपका तहेदिल से शुक्रिया अदा करते हैं,” असे म्हणत आणि त्या
मुलीला डोळा मारीत तो केबिनकडे निघाला.
जगदाळे सरांनी त्याला इतर तीन पैकी कुठलीही मीटिंग रूम
घेण्याचा चॉइस दिला. परत येऊन त्याने तेजस्विनीला म्हटले, “जरा बाहेर येतेस? तुला
काही दाखवायचे आहे.”
तिच्यासोबत तो पुन्हा हॉलमध्ये आला. आधीच्याच ठिकाणी
थांबून त्याने इतर तीन रूम्सकडे निर्देश करीत म्हटले, “या तीन पैकी कुठलीही रूम
निवड. तिथेच आपण आपला तात्पुरता संसार थाटू या.” नाकाच्या शेंड्यावर राग असलेल्या
तेजस्विनीचा नूर एकदम पालटला. फुस्सकन हसत तिने त्याच्या पाठीवर गुद्दा मारला.
“Her
highness would like the one farthest from the Admin office.” ती जरा रुबाबात म्हणाली.
“Your wish is my command,” नचिकेत केबिनमधून दोघांचे लॅपटॉप आणि
बॅकपॅक घेऊन आला. नवीन रूममध्ये बसल्यावर तो म्हणाला, “आता कसं बरं वाटतंय. सगळे
लोक दिसताहेत. काही प्रमाणात त्यांचे आवाजही येताहेत. This gives me a better feel of the office atmo. एक लक्षात ठेव. कुठल्याही परिस्थितीत हे
ब्लाइंड्स उघडेच असले पाहिजेत.”
“Yeah, whatever,” असे पुटपुटत तेजस्विनी कामात गर्क झाली.
नचिकेतचा पहिला दिवस
ऑफिसची कामाची पद्धत, तिथले डिपार्टमेंट्स, तेथील काम करणारे लोक, टीम्स, टीम
लीड्स यांची माहिती गोळा करण्यात गेला. पहिल्याच दिवशी जगदाळे सरांनी त्याच्यासोबत
ऑफिसचा एक चक्कर मारून त्याची ओळख सर्वांशी करून दिली. दुसऱ्या दिवशी, म्हणजे
शुक्रवारी तो दिवसातून पाच स्टाफ मीटिंग्समध्ये बसला. “I am the invisible man. I am the fly on the
wall, the listening device you don’t have to worry about,” हे त्याने स्टाफला आधीच सांगितले होते.
मीटिंग्सच्या दरम्यान घेतलेल्या नोट्सने त्याची एक संपूर्ण नोटबुक भरत आली. प्रत्येका
मीटिंगनंतर आपल्या रूममध्ये येऊन त्याने आपली फर्स्ट इम्प्रेशन्स मोबाइलवर ऑडियो
रेकॉर्ड करून ठेवली. लिहीण्याचे श्रम आणि वेळ वाचवला.
“उद्या या ऑफिसातला आपला
शेवटला दिवस. राधिका आपण दोघांना लंचला नेणार आहे,” पुढच्या आठवड्यात तेजस्विनीने
त्याला सांगितले.
“हो, शेवटला दिवस लक्षात
आहे मला. पण लंच... हरकत नाही. राधिकाशी मला बोलायचेच होते. लंचच्यावेळी उरकता
येईल ते,” नचिकेत आपल्या वहीत कसलीशी नोंद करीत म्हणाला. लिहून झाल्यावर त्याने वर
पाहिले. तेजस्विनी त्याच्याच कडे बघत होती. “काय झालं मिस तेजू के जूते?”
“काय?” ती गोंधळली.
“तेजू के जूते. इंग्रजीत
याला palindrome असे म्हणतात. उलटे वाचले तरी तशीच अक्षरे
असतात.”
“अस्सं होय. Palindrome माहीत आहे मला, पण तुम्ही काय बाबा, मोट्ठे
साहित्यिक.”
“ते एक आहेच. तर, माझ्या
प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस.”
“ते होय. अरे, मी...
मला... मी विचारणार होते की... शनिवारी काय करतो आहेस? डिस्को आणि डिनरला यायला
आवडेल तुला माझ्यासोबत?” तेजस्विनीने घाई-घाईने नजर आपल्या स्क्रीनकडे वळवली.
“Hmmm. डिस्को नको, पण डिनर करू या. नो प्रॉब्लेम.”
“डिस्को नको?”
“मला आवडत नाही. शांतता
आवडते. बसून राहाणे, कोणी सोबत असेल तर अधून-मधून बोलणे, नसेल तर विचार करत
राहाणे. मी तसा बोरिंग माणूस आहे.”
“चालेल, डिस्को नाही, तर
राहिलं. ए, डिनरला कुठे जाऊ या?”
“कुठे ही. तुला परवडेल
तिथे जाऊ या.”
“What?”
“हो. मला अमूक एकच ठिकाण
किंवा अमूकच cuisine हवे असे नाही. पावभाजीसुद्धा चालेल.”
काही क्षण तिच्याकडून प्रतिसाद नाही आला तेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले. तिच्या
चेहऱ्यावर अजून गोंधळ दिसतच होता. “After all, you are inviting me.” तिने मान खाली घातली. बराच वेळ काहीच बोलली नाही. “मग, कुठला विचार
केलास?” त्याने सहजपणे विचारले. शांतता.
तो उठून तिच्या
खुर्चीपाशी गेला. ती फक्त कीबोर्डवर बोटे ठेऊन बसली होती. काहीच करत नव्हती.
त्याने तिला टपली मारली. “थट्टा करतोय मी. Don’t be so serious. उगाच मनाला लावून घेऊ नकोस. I was joking. ए, वेडाबाई. वर बघ.”
तिच्या घशातून काही आवाज
उमटले. त्याला आश्चर्य वाटले. कसलेच कारण नसताना ही रडत्येय कशाला? तेवढ्यात तिने
मान वर करून त्याच्याकडे बघितले. तिचा चेहरा लालबुंद झाला होता. रडू येत होते
म्हणून नाही, तर हसू दाबून ठेवले होते त्यामुळे. दोघांची नजरानजर होताच तिच्या
हास्याचा मोठा स्फोट झाला.
“मला वाटले नव्हते तू
अगदी खुर्ची सोडून इथे येशील.” हसून झाल्यावर ती म्हणाली.
“मस्त अॅक्टिंग करतेस तू.”
“तर मग ‘जिव्हाळा’ मध्ये जाऊ या.”
“डन.”
शनिवारी तेजस्विनी ऑफिसमधून
लवकर निघून गेली. नचिकेत साडे आठ वाजेपर्यंत एका वर्तमानपत्राच्या पानभर
जाहिरातीची कॉपी तयार करीत होता. काम संपवून त्याने हुश्श केले आणि त्याचा फोन
वाजला. तेजस्विनीचाच होता, त्याला आठवण करून देण्यासाठी. फोनवर मोजकेच बोलून तो
ऑफिसमध्येच तोंड धुवून फ्रेश झाला, कपडे व्यवस्थित केले आणि निघाला.
जिव्हाळामध्ये बाइक पार्क
केल्यावर त्याने तेजस्विनीला फोन केला. ती आधीच येऊन आत बसलेली होती. हेलमेट
बाइकवर ठेवावे किंवा आत न्यावे हा विचार एक क्षण त्याच्या मनात आला, पण मग हेलमेट
हातात धरून तो आत शिरला.
"Your helmet,
sir?" आत एका वेटरने हात पुढे केला.
"Yes, and I have a bill to prove it," असे म्हणत त्याला हेलमेट न देता तो पुढे गेला. त्याच्या आवडत्या
नटांपैकी एक लेस्ली नील्सन याच्या एका सिनेमातील हा डायलॉग म्हणावा असे फार
वर्षांपासून त्याच्या मनात होते. ती हौस त्याने आज भागवून घेतली.
तेजस्विनीला पाहिल्यावर तो थक्कच झाला. नेहेमीची रुक्ष
कपडे घालणारी तेजस्विनी आज जीन्स-टॉपमध्ये होती. केस मोकळे सोडलेले, हलका मेकअप.
तिने नचिकेतकडे बघताच त्याने स्वतःला टपली मारली आणि डोळे मिचकावले. "तू, तूच
का तुझी जुळी बहीण?" असे तो विचारता झाला. आपण अगदीच ऑफिसच्या कपड्यात, फक्त
तोंड धुवून आलेलो आहोत याची त्याला जाणीव झाली. त्याने मनोमन खांदे उडवले आणि तो
विचार मनातून काढून टाकला.
तिच्या समोर बसताना तो म्हणाला, "मी तसाच कमी बोलतो.
तुला पाहिल्यावर तर माझी बोबडीच वळली. छान दिसतेस. किती वेळ लागला तुला तयार
व्हायला?"
"उगीच काही तरी बोलू नकोस. एवढी काही नटून आलेले
नाहीये मी."
"म्हणूनच ऑफिसमधून सहा वाजता निघून गेली होतीस काय.
एवढा वेळ नटायला घेतेस तू?"
गप्पा मारीत जेवण झाले. नंतर नचिकेतने घड्याळ बघितले. साडे
तीन तास कधी निघून गेले होते त्याला कळले सुद्धा नव्हते. तेजस्विनीसोबत तो बाहेर
आला. "तुला घरी सोडतो मी. कुठे राहातेस?"
"खोटं बोललास तू माझ्याशी." त्याने तिच्याकडे
प्रश्नार्थक पाहिले. "मी म्हणे फार बोलत नाही. गप्प बसून राहाणे आवडते. आज
कुठे सोडून आलास त्या नचिकेतला?"
"तो पिऊन तर्र झाला होता. त्याला त्याच्या मित्रासोबत
सोडून आलो मी. कुणास ठाऊक कुठे असेल तो." त्या आठवणीने त्याच्या मनात थोडासा
कडवटपणा आलाच. मोठ्या प्रयत्नाने तो त्याने आवाजात येऊ दिला नाही.
"उद्या सिनेमाला येतोस?" तिने रस्त्यात विचारले.
"नको. उद्याचा दिवस मी जरा शांतपणे घालवणार
आहे."
"अस्सं. मीच कमनशीबी. एकही सायलंट सिनेमा लागलेला
नाही सध्या."
"ए बये, उगीच टोमणे मारू नकोस. घरी ड्रॉप न करता
नुसताच ड्रॉप करून निघून जाईन."
"Promises, promises."
"ह्यॅ ह्यॅ ह्यॅ. Very funny."
सोमवारी ऑफिसमध्ये तेजस्विनीने त्याला विचारले,
"सापडला का 'तो' नचिकेत? कुठे कडमडला होता परवा?"
"हो, सापडला. तुझ्या जुळ्या बहिणीसोबत जेवायला गेला
होता असं म्हणाला," नचिकेतने ईयरबड्स काढीत उत्तर दिले. 'खीक' करून तेजस्विनी
निघून गेली. ईयरबड्स पुन्हा कानांत खोचत तो समाधिस्थ झाला. आज त्याला पुन्हा आनंदीची
आठवण प्रकर्षाने येत होती. मोठ्या प्रयत्नांती त्याने कामात लक्ष घातले.
पुढच्या एक-दोन महिन्यांत तेजस्विनीसोबत त्याला काही सेल्स
कॉल्ससाठी जावे लागले. काही सेल्स कॉल्समध्ये क्लायंटने क्रियेटिव्ह कामाबद्दल
काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांसाठी तिने फॉलोअप मीटिंग्स ठरवून नचिकेतला
सोबत नेले. असे बरेचदा झाले. मगो सरांना तेजस्विनीची ही आयडिया आवडली त्याला एक
कारण हे ही होते की नचिकेत ज्या क्लायंटना भेटला ते सर्व सेल्स लीडमधून
कस्टमर्समध्ये कन्व्हर्ट झाले होते.
या आणि अशाच काही कारणांमुळे त्याची तेजस्विनीशी मैत्री
वाढत गेली. एके दिवशी डिनरच्या वेळी त्याला अपेक्षित नसताना तेजस्विनीने त्याला सांगितले,
"निक, मला तू फार आवडायला लागला आहेस." खरं तर त्याच्या मनातील आनंदी
अजून जागा रिकामी करायला तयार नव्हती. तसा आनंदीकडून त्याला काहीच प्रतिसाद
नव्हता. आता तर ईमेलची उत्तरे येणेसुद्धा बंद झालेले होते. तिने फेसबुकवर येणे
कधीच सोडले होते. व्हॉट्सएपचा अकाउंटच तिने डिलीट करून टाकलेला होता. नाही
म्हणायला तो ही बराच सावरला होता. First and last waking thought आता बरेच फिकट झाले होते.
"मला काय बोलावे सुचत नाहीये. आत्ता मी – माझी
मनःस्थिती नाही याबद्दल विचार करण्याची."
"मला आनंदीबद्दल माहीत आहे."
"अस्सं. काय माहीत आहे?"
"की तू – तुझं तिच्यावर प्रेम होतं. तिनं नकार दिला
म्हणे."
नचिकेतने एक उदास स्मित केले. "कोण म्हणे?"
"अमृता आणि गीतिका. मी ऑफिसमध्ये असले की त्यांच्याच
सोबत लंच घेते. आनंदीचे ही तसेच होते. तिनेच त्यांना सांगितले असे त्या दोघी
म्हणाल्या." नचिकेत गप्प बसला. त्याच्या लेखी ही माहिती विशेष महत्वाची
नव्हती. "अजून विसरला नाहीस तिला?" तिजस्विनीने हलक्या आवाजात विचारले.
"नाही. मला रोज बरेचदा तिची आठवण येते. तुझ्यासोबत
असताना देखील. पण तिच्याशी प्रत्यक्ष काँटॅक्ट झाल्याला आता साधारण सहा महिने झाले
असतील."
"मला कळतंय. मला सुद्धा ब्रेकअपमधून बाहेर पडायला
बराच वेळ लागला होता."
नचिकेत थोडा रिलॅक्स झाला. थोडाच. "काय झाले होते?"
काही तरी बोलायचे म्हणून त्याने विचारले.
"माझा कॉलेजमेट होता अखिलेश. कॉलेजची शेवटली दोन
वर्षं आम्ही प्रेमात काढली. नंतर त्याला नोकरी लागली एचयूएलमध्ये. तिथे सेल्स
म्हटले म्हणजे भटकंती. कधी ही एकदम उठून महाराष्ट्रात कुठे ही जायचा. त्याचं
स्वप्न होतं – आमच्या लग्नाआधी त्याला तिथेच 'मुंबई अँड रेस्ट ऑफ महाराष्ट्रा'चा
रीजनल हेड व्हायचं होतं. हाती बराच काळ होता. पण त्यासाठी तो अतिशय मेहनत करत
होता. हळू-हळू मला जाणवायला लागले की त्याची ही मेहनत मला नडते आहे. मी त्याला
म्हटले देखील, की तुझ्या सेल्स कॉल्सपेक्षा आपला एकत्र वेळ जास्त महत्वाचा. अनेक
परीने प्रयत्न केला मी त्याला समजावयाचा. त्याच्या इतर मित्र-मैत्रिणींकडून,
त्याच्या भाऊ-बहीण, अगदी त्याच्या आई-वडिलांकडूनसुद्धा. पण he was much too
ambitious. Or maybe he got that way once he was in the job. He was always their
star performer. Best sales person, employee of the year, highest volume winner
– he was hooked to that life. He just couldn't let go. He
became a workaholic.
"Long story short, I left him before his ignorance of my needs
became too much to handle. मी त्याला सांगितले की तुला जेव्हा कळेल
की आपल्या महत्वाकांक्षेपुढे आपण आपल्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींना दुरावतो
आहोत, तेव्हा तुला माझी आठवण येईल. पण तेव्हा मी तुझ्यासोबत नसेन."
तेजस्विनीचा चेहरा कसनुसा झाला होता. तिला पुढे बोलवत नव्हते. मान खाली घालून ती
बसून राहिली.
"किती दिवस झाले याला?" पुन्हा एकदा त्याने
'उगीचच आपले काहीतरी' म्हणून विचारले.
"वर्षभरापेक्षा जास्त. दोन वर्षे होतील
ऑक्टोबरमध्ये."
"अॅनिवर्सरी सेलिब्रेट करूया मग." नचिकेतच्या या
वाक्यानंतर तेजस्विनीला एकाच वेळी हसू आणि रडू येत होते. काही वेळाने ती सावरली.
त्याचा हात हातात घेऊन बसून राहिली.
"मला तुझा स्वभाव फार आवडतो. You know how to
relieve the tension, lighten up the atmosphere. You – take
your time. बहुतेक मीच घाई केली मन मोकळं करायला." तेजस्विनी
म्हणाली.
"That's your right and my privilege. मला माझंच जरा
समजून घेऊ दे. Let's see what happens."
चार दिवसांनंतर रविवारी संध्याकाळी टपरीवर चहा पीत असताना
त्याने पक्याला हे सर्व सांगितले. "च्यामारी, तुझी मौज आहे लेको. एक गेली,
दुसरी आली. आमची एकच आम्हाला सोडत नाही." पक्याने सिगारेटचा धूर त्याच्या
विरुद्ध दिशेला सोडत म्हटले. पण नंतर लगेच गंभीरपणाचा आव आणत म्हणाला, "मग
आपला मनसुबा काय, राजे?"
"आम्हांला काहीच सुचत नाहीये पक्या राव. त्यासाठीच
आम्ही आपल्याशी खलबत करू इच्छितो."
"आपणाला तेजू बाई साहेब आवडतात का?"
"होय. प्रांजळपणे कबुली देतो. आवडतात. पण आनंदी बाई
साहेवांची साथ सोडायला आमचं मन कचरतंय."
"असं करा, ग्लेनफिडिचचा एक खंबा विकत घ्या आणि आमच्या
चरणी अर्पण करा. आई तुळजा भवानीच तुम्हांस बुद्धी देईल."
"पक्या राव, ग्लेनफिडिचच्या एका खंब्याला काय,
एक-चतुर्थांशालासुद्धा हात लावायची औकात नाही तुमची. तेव्हा जिभेला लगाम घाला आणि चहावाल्याचे
पैसे द्या. आत्ताचे अन् गेल्या वेळचे सुद्धा."
"महाराज, हा अन्याव हाय. आपल्या विड्यांचे पैसे
आम्हीच गेल्या आदितवारी भरले होते. आपण आमच्यापेक्षा मोठ्या नोकरीत आहांत. हे
आपणास शोभत नाही."
"आम्हांला कळते आहे आपण काय सांगू इच्छिता पक्या राव.
आमची नोकरी आपल्यापेक्षा मोठी याचाच अर्थ आम्ही आपल्यापेक्षा अधिक मोठे नोकर, असाच
ना? ते काही नाही. आणि विड्यांचे पैसे म्हणे. आम्ही आपल्यासारखे विड्या ओढीत
नाही."
"अहो, पण विडा खाताच की. अनर्थ करू नगा म्हाराज. डोके
ताळ्यावर ठेवा. नाही तरी तेजू बाई साहेवांनी ते फिरवण्यात काहीच कसर सोडलेली
नाही."
"खरंय रे, बाबा. ती प्रेम-मूढतेची, सुटती न गूढ
कोडी."
"हे एक काय नवीन?"
"नवीन नाही. फार जुने कुमारजींचे भावगीत आहे,
"कोणा कशी कळावी". खरंच, कंटकांची नागमोडी वाट तुडवतोय असंच वाटत आहे
मला." नचिकेतने पक्याला ते गाणे संपूर्ण ऐकायला लावले. ऐकून झाल्यावर पक्याने
ईयरबड्स त्याला परत देत कोपरापासून हात जोडले.
"साल्या, हे गाणं ऐकतोस आणि मलाच विचारतोस काय करू!
शीक, गाढवा, त्या गाण्यातून तरी काही शीक."
"हे हो काय पक्या राव?"
"जाणोनि लोटा आपली होडी या वादळात, आणखी काय? लहरींवरी
फिरा, जळी हेलकावे घ्या."
"खरंच का रे? तुला खरंच वाटतंय मी आनंदीला विसरू
शकेन?"
"ते विस्मरण सुरू झालेले आहे लेका. मला सांग, when
was the last time her memory disturbed you enough to make you stop your train
of thoughts? आठवतंय काही?"
"नाही. पण माझं मन तिचे विचार सोडायला तयारच होत
नाहीये."
"असं तुला वाटतंय. उत्स्फूर्तपणे येणारी आठवण जवळ-जवळ
बंद झालेली आहे. आता उरलीयेत ती फक्त withdrawal symptoms.
तुझ्या मनाला तिची आठवण फेड होणे सहन होत नाहीये, म्हणून ते त्या आठवणी उकरून
काढीत आहे. I think you're ready with a clean slate. Go ahead. Give it a
try." पक्याने सिगारेटचे थोटूक पायाखाली विझवत म्हटले.
नंतर बराच वेळ पक्याने त्याची समजूत घातली. रात्री घरी
परतताना ग्लेनफिडिचच्या क्वार्टरची अर्धी भरलेली बाटली पक्याच्या बॅगेत कोंबताना
नचिकेत म्हणाला, "हे घ्या पक्या राव, तुमची गुरूदक्षिणा. धुवून काढलंत आज
तुम्ही आम्हांला. खूश आहोत आम्ही तुमच्या बदजबानीवर."
उत्तरादाखल पक्याने नचिकेतच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार
करून म्हटले, "म्हाराज, अशीच म्हेरबानगी ठेवा दासावर. आणि इथून गेल्यावर घरात
शिरताना जास्त आवाज करू नगा. गाणी-गिणी तर अजिबाद म्हणू नगा."
दुसऱ्या दिवशी तो ऑफिसमध्ये पोचला तेव्हा तेजस्विनी आलेली
नव्हती. तो आपल्या कामात गर्क झाला. काही वेळाने सुगो मॅडमसोबत तेजस्विनी ऑफिसात
शिरली. तो सावध झाला. त्या दोघी सरळ केबिनमध्ये शिरल्या आणि दार लावून घेतले.
नचिकेत मनातून थोडा खट्टू झाला, पण त्याने पुन्हा कामात लक्ष घातले. त्या दिवशी
असेच घडले. तेजस्विनी त्याच्याशी बोलली, पण नेहेमी कोणीतरी त्याच्या किंवा तिच्या
सोबत असायचे. दिवसातून पाच-सहा वेळा असे झाल्यावर त्याने तिच्याशी बोलण्याचा नाद
सोडला. संध्याकाळी काम आटोपून लॅपटॉप बंद करीत त्याने ऑफिसभर नजर फिरवली.
तेजस्विनी कुठेच दिसत नव्हती. ती सेल्स कॉलसाठी बाहेर गेलेली नाही हे त्याला माहीत
होते. खांदे उडवीत बॅकपॅक पाठीला लावून तो निघाला.
तो बाइकमध्ये चावी लावणार तेवढ्यात मागून तेजस्विनीचा आवाज
आला, "आज बराच बिझी होतास म्हणे."
बाइकचा लॉक उघडून हेलमेट हातात घेत तो वळला. तेजस्विनीच्या
चेहऱ्यावर हसू होते. "हो, एक व्हिडियो कॉपी तयार करीत होतो." ती
त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. काही क्षण शांततेत गेले.
"मी –"
"तू –"
दोघंही एकदम बोलले आणि थांबले. दोघांनाही हसू फुटले.
नचिकेत अवघडला. तो विचार करत होता की त्याच्या मनातील विषयाला वाचा कशी फोडावी.
ही गोष्ट लिहायला सुरू करताना 'कोणा कशी कळावी' हे गाणं त्यात ओवता येईल का, असा विचार मनात नव्हता. फक्त गोष्टीचं नाव 'कोणा कशी कळावी' असायला हवं असं वाटत होतं. पण लिहीताना विचार आला की जर संपूर्ण गाणं गोष्टीत वापरता आलं तर पाहावं. प्रयत्न केला आहे.
ReplyDelete